पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा तालुक्यात बदरखे गावात यात्रा सुरु आहे. या यात्रेत सोमवारी पहाटे मित्रासह तमाशा पाहण्यास गेलेल्या तरुणाचा सकाळी मृतदेह आढळून आला. दरम्यान, त्याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने नातेवाईकांनी त्याचा घात झाला असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनकामी जळगावच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.
दीपक ज्ञानेश्वर निकम (वय २६, रा, हनुमंतखेडे, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, विवाहित बहिणीसह राहतो. शेतीकाम व खाजगी वाहनचालक म्हणून काम करीत उदरनिर्वाह करतो. हनुमंतखेडे गावापासून पाचोरा तालुक्यातील बदरखे हे गाव जवळ आहे. बदरखे येथे यात्रा सुरु आहे. या यात्रेत पहाटे ४ वाजता दीपक हा त्याचा मित्र पवन अनिल पाटील यांच्यासह गेला होता. काही वेळाने त्याने मित्र पवन याला घरी सोडले व परत यात्रेत तमाशा पाहायला गेला. दरम्यान, काही वेळाने यात्रेत तमाशाठिकाणी गर्दी झाली. तेथे दीपक निकम याचा चुलतभाऊ किरण निकम याने पाहिले तर दीपक निपचित पडलेला होता. तर त्याला मारहाण झालेली प्रथमदर्शनी दिसत होती.
त्याने कुटुंबियांना व नगरदेवळा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत दीपक निकम याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, मृतदेहावर मारहाणीच्या खुणा व हाडे काही प्रमाणात तुटलेले जाणवल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यानुसार शवविच्छेदनासाठी दीपक याचा मृतदेह जळगाव शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे.
दीपक निकम याच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याने, पोलिसांनी सखोल तपास करून त्याच्या मृत्यूचे सत्य बाहेर आणावे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पाचोरा पोलीस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाचोरा पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे.