जळगावातील आशाबाबा नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील आशाबाबा कॉलनी जवळ रेल्वेच्या धडकेत तापी पाटबंधारे विभागातील लिपिकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता आशाबाबा नगरजवळील रेल्वेरुळावर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बळीराम माधव मराठे (वय ५६, रा. सहयोग कॉलनी, पिंप्राळा) असे मयत इसमाचे नाव आहे. तापी पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून नोकरी करीत होते. शनिवारी २३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आशाबाबा नगरजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१७ जवळील ८ ते १० च्या दरम्यान, रेल्वेची धडक लागल्याने बळीराम मराठे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती लोकोपायलट यांनी रेल्वे पोलीसांना दिली.
त्यानुसार आरपीएफ विनोद साळवे यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी जयश्री, मुलगा लोकेश, आणि दोन मुली असा परिवार आहे.