जळगाव शहरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- आपल्या मूळ गावी कुटुंबीयांसह गेल्याची व त्यांचे बंद घर पाहून चोरटयांनी संधी साधून घरफोडी केली. रोख ३० हजारांसह साडे नऊ तोळ्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
मूळ पाथरी येथील रहिवासी असलेले पंडित तुळशीराम माळी (ह.मु. संभाजीनगर, जळगाव) हे जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीला आहेत. पाथरी ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने ते कुटुंबीयांसह गावी गेले होते. त्यावेळी शुक्रवार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व रोख ३० हजार रुपयांची रक्कम, साडे नऊ तोळ्यांचे दागिने असा मुद्देमाल चोरून नेला. शनिवारी माळी यांच्या पत्नी घरी आल्या त्यावेळी घटना समोर आली. त्यांनी पती पंडित माळी यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी घरी येऊन पाहणी केली व रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.