मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याची घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील मेहरूण भागातील जोशी वाडा परिसरात नवरात्रोत्सवानिमित्त देवीची मूर्ती आणण्यासाठी काही तरुण बऱ्हाणपूर येथे गेले होते. तेथून परतत असताना मुक्ताईनगर तालुक्यातील पुरणाड फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. त्या अपघातात देवीची मूर्ती अंगावर पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय उर्फ जितू गोपाल कोळी (वय ३५ रा. जोशी वाडा, मेहरूण) असे मयत तरुणाचे नाव आहे. कॉलनीत नवरात्र उत्सवानिमित्त देवी बसवण्यासाठी तयारी झालेली होती. त्याकरिता देवीची मूर्ती बऱ्हाणपूर येथून आणण्यासाठी मंडळाचे काही कार्यकर्ते हे शनिवारी गेलेले होते. तेथून परतत असताना रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास पुरणाड फाट्यावर वाहनाचा अपघात झाला. या अपघातामध्ये देवीची मूर्ती जितू उर्फ संजय कोळी यांच्या अंगावर पडल्याने त्याच्याखाली दाबून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्याच्या मित्रांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. कुटुंबियांना फोनवर माहिती देण्यात आली. त्यावेळी त्यांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी जळगाव येथील एका कंपनीमध्ये तो खिडक्यांच्या सेंटरिंगचे काम करीत होता. दरम्यान मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जितू उर्फ संजय कोळी यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे.