चोपडा तालुक्यातील वराड येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दीड महिन्यांपूर्वी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या व परिसरात खेळत असताना एका पाच वर्षीय चिमुकलीचा फ्रॉक पेटत्या दिव्यावर पडल्याने आग लागून ती गंभीररीत्या भाजली होती. अखेर तिचा ३ सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान सुरत येथे मृत्यू झाल्याने महिन्याभराने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विदिशा विकास कोळी (वय ५, रा. वराड ता. चोपडा) असे मयत बालिकेचे नाव आहे. ती ऑगस्ट महिन्यात गावातील महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी गेली होती. तेथे खेळत असताना मंदिरातील पेटत्या दिव्यावर तिचा फ्रॉक पडल्याने कपड्यांनी पेट घेतला. त्यात ती भाजली गेली. तिला सुरुवातीला जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले होते. तेथून सुरत येथील नवीन हॉस्पिटल येथे २६ ऑगस्ट रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचाराअंती ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास विदिशाचा मृत्यू झाला. यावेळी तिच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्यामुळे झिरो नंबरने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार बापू साळुंखे तपास करीत आहेत.