जिल्ह्यातील बसस्थानक झाले चोरट्यांचे आवडते, पुन्हा लांबविली मंगलपोत !
भडगाव बसस्थानकातील घटना
भडगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील बसस्थानक आता चोरट्यांचे आवडते झालेले दिसून येत आहेत. जळगाव बसस्थानक, भुसावळ बसस्थानकानंतर आता भडगाव बसस्थानकात चोरटयांनी हातसफाई दाखविली आहे. एका महिलेच्या गळ्यातून ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत अज्ञात चोरट्याने लांबविली आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेबीबाई रमेश पाटील (वय-५२, रा.माळीनगर, शिरपूर ता. धुळे) या महिला नातेवाईकांकडे भडगाव तालुक्यात आल्या होत्या. २३ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास बेबीबाई पाटील ह्या भडगाव बस स्थानकाच्या आवारात आलेल्या होत्या. तेव्हा हातचलाखी करीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २४ ग्रॅम वजनाचे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत चोरून नेली.
दरम्यान चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने परिसरात सर्वत्र शोध घेतला, परंतु काहीही मिळाले नाही. अखेर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याबा नागरे करीत आहे.