भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत तरुणाचा मृत्यू
धरणगाव तालुक्यातील पाळधीच्या महामार्गावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तरुणाचा धरणगाव तालुक्यातील पाळधी ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान शनिवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकने त्याला मागून धडक दिली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे त्यास मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
भूषण संभाजी महाजन (माळी, वय २९, रा. पिंपरखेड ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पिंपरखेड गावामध्ये आई, पत्नी, चार वर्षाचा मुलगा, भाऊ यांच्यासह राहतो. प्लंबिंग काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी तो त्याच्या नातेवाईकांकडे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आला होता. रात्री दहा वाजेनंतर तो शिरसोली वरून पिंपरखेडला पाळधीमार्गे जायला निघाला होता. विद्यापीठाच्या दिशेने चालत असताना त्याला अज्ञात ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.दरम्यान पाळधी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली .
दरम्यान रात्री त्याची ओळख पटली नव्हती सकाळी त्याच्या मोबाईल वरून पोलिसांना ओळख पटवण्यात यश आले. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय दुपारी सरकारी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्याच्या कुटुंबीयांनी हृदयद्रावक आक्रोश केला. त्यानंतर शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. दरम्यान धडक देणारा ट्रक हा दहा ते बारा चाकांचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.