हॉन्गकॉन्ग (वृत्तसंथा) – जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून आता हॉन्गकॉन्गमधील एका पाळीव कुत्र्यालाही कोरोना झाला असल्याची माहिती मिळत आहे. हॉन्गकॉन्गमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हॉन्गकॉन्गमध्ये राहणाऱ्या एका 60 वर्षीय वृद्ध महिलेच्या पाळीव कुत्र्याला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. पहिल्यांदाच माणसाकडून एखाद्या प्राण्याला संसर्ग झाल्याची ही पहिलीच घटना आहे.
पामेरियन प्रजातीच्या या पाळीव कुत्र्याच्या मागील शुक्रवारपासून सतत तपासण्या सुरू होत्या. त्यानंतर त्याला कोरोना झाल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. कुत्र्याला आता स्थानिक कृषी विभाग, मत्स्य आणि संरक्षण विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. या कुत्र्याची मालकीण 60 वर्षांची एक वृद्ध महिला आहे. तिला 25 फेब्रुवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा संबंध थेट सी-फूडशी आहे. कोरोना व्हायरसमुळे लोक आजारी पडत आहेत. कारण या विषाणुंचा एक समूह थेट रूग्णांच्या शरीरावर इफेक्ट करत आहे. हा व्हायरस उंट, मांजर तसेच वटवाघुळ यांसारख्या अनेक प्राणी आणि पक्षांमध्ये पसरत आहे.