जळगाव तालुक्यातील नशिराबाद पुलावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – नशिराबाद येथून जळगाव शहरात दुचाकीने येत असतांना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने जळगाव शहरातील पिंप्राळा येथील तरूण जखमी झाल्याची घटना नशिराबाद येथील पुलावर घडली होती. या घटनेप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात मंगळवारी २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूपेश कमलाकर सोनवणे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण कामाच्या निमित्ताने २० जुलै रोजी जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात गेला होता. काम आटोपून रात्री ८ वाजता दुचाकी (एमएच १९ बीके ३९७) ने नशिराबाद येथून जळगाव शहरात येण्यासाठी निघाला होता. महामार्गावरील पुलावरून येत असतांना मागून येणारा ट्रक (एमएच १८ बीए २०८) ने जोरदार धडक दिली. या धडकेत रूपेश सोनवणे हा तरूण गंभीर जखमी झाला. जखमी तरूणाला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, जखमी रूपेशचा भाऊ योगेश सोनवणे यांने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी २५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन करीत आहे.