पुढील ३ दिवस जिल्हाभर करणार प्रचार प्रसार
जळगाव (प्रतिनिधी) – आपण बऱ्याच वेळा छोट्या मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करतो. हेच आजार भविष्यात मोठे रूप धारण करतात. आजार वाढू नये यासाठी तातडीने तपासणी करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागांमध्ये सकाळी तपासणीसाठी निश्चिंत होऊन यावे असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी केले.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मुंबई यांचेमार्फत संपूर्ण राज्यभर राबविल्या जाणा-या विविध जनजागृती अभियानासाठी एलईडी व्हॅनव्दारे प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी आखलेल्या आराखडयानुसार आजपासून सलग ४ दिवस जनजागृती मोहिम राबविण्यांत येणार आहे. या मोहिमेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. सदर एलईडी व्हॅन आजपासून ४ जुन पर्यन्त जळगांव शहर व ग्रामीण भागात प्रचार व प्रसार करणार आहे. या संपूर्ण अभियांनाच्या प्रचार व प्रसाराची जबाबदारीसाठी डॉ. रितेश सोनवणे, सहाय्यक प्राध्यापक,औषधशास्त्र यांची नेमणूक करण्यांत आलेली आहे.
प्रसंगी उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, अभियानाचे विविध नोडल अधिकारी डॉ. दुष्यंत पवार, डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. ज्योती बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाच्या आवारातील नागरिकांना अवयवदान, स्तन कर्करोग, लठ्ठपणा, हाडांचा ठिसूळपणा, मुखरोग, थायरॉईड आदि आजारांविषयी माहिती देण्यात आली. नागरिकांना आजारांविषयी अवगत करून प्रबोधित करण्यात आले.
ही जनजागृती करणारी व्हॅन २ मे रोजी जळगाव शहरातील विविध भागांमध्ये प्रचार प्रसार करणार आहे. ३ रोजी चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाळधी या ठिकाणी तर ४ मे रोजी चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि शिरसोली या गावांमध्ये जनजागृती करणार आहे. अभियानामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तपासणी करून घ्यावी. सहकार्य करावे, असे आवाहन महाविद्यालय व रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.