जामनेर (प्रतिनिधी) – आपल्या बाळाला झोक्यात झोपवून कामावर निघून जाणे एका आईला चांगलेच महागात पडले आहे. बाळ झोक्यातून पडू नये म्हणून त्याला आईने रुमाल बांधला होता. मात्र याच रुमालाने बाळाला झोपेतून उठल्यानंतर रुमालाचा गळफास लागला. यात चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटना गुरुवारी दुपारी जामनेर शहरातील गिरीजा कॉलनीत घडली आहे.
निर्भय वसंत इंगळे असं अवघ्या एका वर्षाच्या मयत चिमुकल्याचं नाव आहे. दहा दिवसांपूर्वीच निर्भयचा पहिला वाढदिवस साजरा झाला होता. गिरीजा कॉलनीत वसंत इंगळे हे पत्नी व कुटुंबासह वास्तव्यास आहेत. वसंत इंगळे हे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. तर त्यांची पत्नी रुग्णालयात कामाला आहे. गुरुवारी वसंत इंगळे हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने कामावर जाण्यापूर्वी मुलगा निर्भयला दूध पाजले. मग त्याला झोपविले.
निर्भय झोक्यातून पडू नये म्हणून मध्यभागी झोक्याला रुमाल बांधला. त्यानंतर घरात असलेल्या तिच्या धाकट्या बहिणीला निर्भयवर लक्ष ठेवण्यात सांगून निर्भयची आई रुग्णालयात कामावर निघून गेली. निर्भयच्या मावशीने जेवणापूर्वी झोळीतील निर्भयकडे डोकावून पहिले असता तो झोपेत होता. त्यानंतर जेवण करून परतल्यानंतर पुन्हा निर्भयला पाहण्यासाठी मावशी केली असता, निर्भय हा झोक्याबाहेर लटकलेला दिसून आला. ते पाहून निर्भयच्या मावशीला धक्काच बसला. तिने त्याला बाहेर काढले, मात्र तो हालचाल करीत नसल्याने लक्षात आल्याने तिने निर्भयच्या आई व वडिलांना तात्काळ बोलावून घेतले.
तातडीने निर्भयला जवळच्या खाजगी रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत निर्भयने प्राण सोडले होते. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगताच निर्भयच्या आई वडीलांसह कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. अचानक जागं झालेल्या बाळाने खाली उतरण्याचा प्रयत्न करताच त्याच्या संरक्षणासाठी बांधलेला रुमालच त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला.
या दुर्दैवी घटनेने गिरीजा कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान दहा दिवसांपूर्वी आनंदी वातावरणात निर्भय याचा पहिलाच वाढदिवस साजरा झाला होता. मात्र त्याच्या मृत्युने इंगळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे.