पाचोरा (प्रतिनिधी) – तालुक्यातील तारखेडा बुद्रुक येथे एका बांधकाम मजुराने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील हातले येथील सिद्धार्थ सुदाम खैरे (वय – २८) हा तरुण तारखेडा ता. पाचोरा येथे सासरवाडीत सेंट्रींग काम करुन आपला व आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होता. दरम्यान २६ मे रोजी सिद्धार्थ हा घरी एकटा असतांना त्याने घराच्या छताला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. सदरचा प्रकार कुटुंबिय व शेजारींच्या लक्षात येताच सिद्धार्थ यास तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सिद्धार्थ खैरे याचे पश्चात वडिल, आई, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. सिद्धार्थच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.