जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील नशिराबाद गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत पडल्याने एक १३ वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. संबंधित शाळा प्रशासन आणि बांधकाम करणारा ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी मयत मुलाच्या नातेवाईकांनी केली. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा.नशिराबाद) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. मोहित हा आईवडील व मोठा भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होता. मोहित हा सातवीच्या वर्गात शिकत होता. शुक्रवारी ३१ मार्च रोजी सकाळी मित्रांसोबत सनसवाडी रोडवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेळत होता. खेळताखेळता अचानक शाळेची संरक्षण भिंत त्याच्या अंगावर कोसळली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्याची उपचारादरम्यान प्राणज्योत मालविली. मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संबंधित शाळा प्रशासन आणि ठेकेदार याच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मुलाचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मयत मोहितचे वडील योगेश अशोक नारखेड यांनी केला होता. मयताच्या पश्चात मोठा भाऊ केतन, आई निर्मलाबाई असा परिवार आहे. तर वडील नशिराबाद येथील ओरिएंट कंपनीच्या सिमेंट फॅक्टरीमध्ये ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीला आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ प्रकाश पाटील आणि योगेश माळी करीत आहे.