जळगाव ( प्रतिनिधी ) – शिवसेनेचे आजही सदस्य असलेले आणि विधानसभा अध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा अधिकृत व्हीप न जुमानणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेची मागणी शिवसेनेने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे . आता नव्या अध्यक्षांना या वादात निर्णय द्यावा लागणार आहे .
विधानसभा सभागृहात निवडणूक प्रक्रिया संपत असतानाच शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी पीठासन अधिकाऱ्यांकडे आपला या मुद्यावरच आक्षेपही नोंदवला होता . त्यानंतर शिवसेना पक्षाने स्वतंत्र तक्रार नव्या अध्यक्षणाकडे दाखल केली आहे . बंडखोरी करणाऱ्या आमदारांची संख्या दोन – तृतीयांशान्पेक्षा जास्त असल्याने शिवसेनेचा व्हीप आमच्यावर बंधनकारक नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे . दुसरीकडे या तक्रारीत शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देताना घेतलेल्या भूमिकांवरही आक्षेप नोंदवले आहेत . शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी राजन साळवी यांच्या उपस्थितीत एका पत्रपरिषदेत ही माहिती दिली .
शिवसेनेच्या या तक्रारीमुळे उद्या विश्वास प्रस्तावाबाबत विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे.