जळगाव (प्रतिनिधी) – ‘गुलाबी रिक्षा चालवून महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतात. कष्टकरी महिलांना रिक्षा घेण्यासाठी अग्रीम रक्कम देऊन भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने त्यांचा मार्ग सोपा केला . आता त्यांच्या प्रगतीची नवी वाट खुली होणार आहे.’
पिंक ऑटोरिक्षा महिला गटाच्या १५ सदस्यांना रिक्षा घेण्यासाठी भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाउंडेशनने अग्रीम रक्कमेसाठी आर्थिक सहाय्य केले हा कार्यक्रम गांधी तीर्थ येथे पार पडला. ज्योती जैन, संध्या वाणी, डॉ. सविता नंदनवार, गीता धरमपाल, अंबिका जैन, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. जमील देशपांडे, निलोफर देशपांडे, सचिव विजय वाणी उपस्थित होत्या .
तीन वर्षांपूर्वी शहरात महिला, मुलींच्या सुरक्षीत प्रवासासाठी महिला ऑटोचालक असाव्या असा विचार पुढे आला. त्यासाठी पाच महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शहरात पिंक ऑटो गटाची स्थापना करण्यात आली. १५ महिलांना रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी अतुल शक्ती ऑटोचे संचालक विद्याधर नेमाने यांनी सहकार्य केले. या सर्व महिलांचा जळगाव जनता बँकेत बचत गट असून त्या मार्फत त्यांना रिक्षा घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करण्यात आले आहे. ऑटो रिक्षा घेणाऱ्या त्या महिलांना डाऊन पेमेंट भरण्यासाठी देखील पैसे नाहीत ही अडचण जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना सांगण्यात आली त्यांनी डाऊन पेमेंटसाठी सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमील देशपांडे यांनी केले आभार प्रदर्शन विजय वाणी यांनी केले.