चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील राष्ट्रीय विद्यालय परिसरात रिक्षाने आलेल्या महिलेच्या पर्समधून ५ लाख ३२ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते चाळीसगाव ग्रामीण पोलीसांनी चार चोरट्यांना अटक करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशान्वये सोन्याचे दागिने महिलेला देण्यात आले
अंकिता प्रतीक पाटील (वय-२५, अहमदनगर ) त्यांच्या आईसोबत मालेगावहून चाळीसगाव येथे २७ जानेवारीरोजी लग्नासाठी आल्या होत्या. राष्ट्रीय विद्यालय समोरून त्या रिक्षात बसून हिरापूर येथे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कपड्याच्या बॅगेतून ५ लाख ३२ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिन्याचा बॉक्स चोरून नेला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात २८ जानेवारीरोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलिस नाईक नितीन आमोदकर करीत होते.
चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो हेकॉ युवराज नाईक, पो ना नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांताराम पवार यांनी संशयित आरोपी अजय अंबादास घुमडकर (वय-२३, रा. संतोषी माता मंदिर, चाळीसगाव), रवींद्र मल्लू घुमडकर (वय-३५ रा. टाकळी ) , विकी बाबुराव घुमडकर (वय-२४ , रा. खरजई ) आणि नितेश शिवाजी पंच (वय-२१ नाशिक ) या चौघांना ३ फेब्रुवारीरोजी अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून २७ हजार ५०० रुपये रोख आणि ५ लाख ८४ हजार ७०० रुपये किंमतीचा १३ तोळ्याची सोन्याची लगड असा एकूण ६ लाख १२ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला न्यायालयाच्या आदेशानुसार दागिने मूळ फिर्यादी अंकिता पाटील यांना देण्यात आले.