डॉ. किरण पाटील नवे जिल्हा शल्य चिकित्सक
जळगाव (प्रतिनिधी ) – येथील जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची बदली करण्यात आली असून धरणगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण मुरलीधर पाटील यांची जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. नागोराव चव्हाण यांची नाशिक येथील रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्रात बदली करण्यात आली आहे.
जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची वैद्यकीय अधिकारी अधिकारी म्हणून रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागातून आलेल्या आदेशात सांगण्यात आले असून त्यांच्या जागी डॉ. किरण पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, धरणगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान कोरोना काळात व्हेंटिलेटर व इतर वस्तू खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दिनेश भोळें यांनी केली असून जिल्हापेठ पोलीस स्थानकात देखील तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चौकशी सुरू असल्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांची बदली झाल्याची चर्चा शहरात होत आहे.