जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील सर्व आधार केंद्र शनिवार , रविवार व सुटीच्या दिवशी बंद असतात. त्यामुळे नागरीकांचे हाल होतात . सर्व आधार केंद्र शनिवार , रविवार व सुटीच्या दिवशी सुरु ठेवा अशी मागणी करणारे निवेदन आज मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले .
आठवड्यात पाच दिवस आधार केंद्र सुरू असतात. नविन आधार बनविणे, आधार नंबर मोबाईलला लिंक करणे, मोबाईल नंबर , बदलविणे, पत्ता बदलविणे, फोटो बदलविणे, बँक खात्याला आधार जोडणे इ. अनेक कामाकरीता आधार अनिवार्य करण्यात आले आहे.
आधार केंद्राच्या वेबसाईटवर आधार केंद्र हे आठवड्याच्या सातही दिवस सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सुरू असतात अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यातील आधार केंद्र शनिवार व रविवार बंद असतात.
बहुतेक आस्थापनांना फक्त शनिवार व रविवारी सुटी असते त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांना फक्त शनिवार व रविवारीच आधार अपडेट करण्याकरीता वेळ मिळतो तसे होत नसल्याने त्यांना त्यांचा रोजगार बुडवून आधार अपडेट करावा लागतो , असे मनसे जिल्हाध्यक्ष अँड. जमील देशपांडे यांनी सांगितले .