गोदावरी आयएमआरच्या एनएसएस विभागातर्फे जनजागृती ग्लोबल हँडवॉशिंग डे निमित्त प्रात्यक्षिकातून योग्य हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले.
जळगाव : ग्लोबल हँडवॉशिंग डे अर्थात जागतिक हात धुणे दिनानिमित्त गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (आयएमआर), जळगाव येथील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे मण्यारखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आरोग्य व स्वच्छता जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.


विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच वैयक्तिक स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजविणे आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाला माजी सरपंच राजूदादा, ग्रामसेविका आणि शाळेचे मुख्याध्यापक जगन्नाथ कोळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी एनएसएस स्वयंसेवकांनी शालेय विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनातील स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगितले. हात योग्य पद्धतीने कसे धुवावेत, याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर तसेच हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
नियमित हात धुण्याच्या सवयीमुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.उपक्रम यशस्वीतेसाठी एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. स्मिता चौधरी, क्रीडा संचालक प्रा चंद्रकांत डोंगरे, एनएसएस सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा दीपक दांडगे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.








