रावेर ( प्रतिनिधी ) – कोयत्याचा धाक दाखवून दोन महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार ऐनपुर ते खिर्डी रोड येथे घडला. अज्ञात चोरांच्या विरोधात निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगीताबाई विजय पाटील (वय-४१) आणि मीराबाई श्रीराम पाटील ( दोन्ही रा. ऐणपूर ता. रावेर ) या दोन्ही महिला १ जानेवारीरोजी सकाळी ऐनपूर ते खिर्डी रोड दरम्यान किशोर भगवान पाटील यांच्या रस्त्यावरील गोडाऊन जवळ केळीच्या पिकाजवळून जात होत्या. त्यावेळी अज्ञात ३० ते ३५ वयोगटातील एक तरुण हातात कोयता घेऊन आला आणि त्याने या दोघा महिलांचा रस्ता आडविला. त्याने कोयत्याचा धाक दाखवून दोन्ही महिलांच्या अंगावरील ६३ हजार २०० रुपये किंमतीचे दागीने जबरी हिसकावून लंपास केले . या घटनेमुळे ऐणपूर परिसरात भीतीचे वातावरण आहे. निंभोरा पोलीस ठाण्यात संगीता पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स पो नि स्वप्नील उनवणे करीत आहेत .