banजळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीतील लोकप्रतिनिधींच्या उमेदवारीवर माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी घेतलेली हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे .

माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी २० ऑक्टोबररोजी ही हरकत नोंदवली होती . भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ३ जून २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार गिरीश महाजन , आमदार संजय सावकारे , आमदार राजूमामा भोळे , आमदार मंगेश चव्हाण , आमदार किशोर पाटील , आमदार चिमणराव पाटील , आमदार अनिल पाटील , महापौर जयश्री महाजन , भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे , जिल्हा परिषद सदस्य आर जी पाटील , नगरसेवक करण पाटील , पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमोल पाटील आदींच्या उमेदवारीवर ही हरकत नोंदवण्यात आली होती .
त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितल्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेचे ३ जून २०२० रोजीचे परिपत्रक हे फक्त मार्गदर्शक सूचना आहेत ते बंधनकारक नाही , असा खुलासा या उमेदवारांकडून करण्यात आला होता महाराष्ट्र सहकारी संस्था ( समिती निवडणूक ) २०१४ नुसार हरकत घेणारे हरकत घेण्यास पात्र नाहीत जिल्हा बँकेच्या कोणत्याही मतदारसंघातून ते उमेदवार नाहीत . कोणत्याही उमेदवाराचे ते सूचक किंवा अनुमोदक नाहीत त्यामुळे ते छाणणीच्यावेळी प्रत्यक्ष हजर राहण्यास पात्र नाहीत . त्यामुळे त्यांची हरकत फेटाळावी असे या उमेदवारांचे म्हणणे होते ते ग्राह्य धरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दीपककुमार गुप्ता यांची हरकत निकाली काढली आहे.







