जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना लसीच्या दोन्ही मात्रा बंधनकारक आहे. किमान एक मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी प्राप्त करून घेतल्यानंतरच नोव्हेंबरचे वेतन देयक अदा करावे, जिल्ह्यातील ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही, अशा कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करू नये, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्हा कोषागार अधिकारी यांना आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जळगाव जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय, खासगी कार्यालयात मास्कचा वापर करणे व लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण मोहीम राबवावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत.