नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – भारतीय औषध नियंत्रक मंडळाने कोव्हॅक्सिन लशीला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस बनली आहे जी मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे.

या मंजुरीनंतर, केंद्र सरकार लवकरच २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल. मुलांवर लसीकरणासाठी मान्यता मिळण्यापूर्वी कोव्हॅक्सिनला दीर्घकाळ चाचणी करावी लागली. भारत बायोटेकने १८ वर्षाखालील मुलांवर तीन टप्प्यात चाचणी पूर्ण केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्या. यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे.
प्रौढांप्रमाणेच मुलांनाही कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस दिल्या जातील. आतापर्यंत घेतलेल्या चाचण्यांमध्ये, कोव्हॅक्सिनचा मुलांवर कोणताही वाईट परिणाम दिसला नाही. क्लिनिकल चाचण्यांमध्ये, ही लस ७८ टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.







