पाचोरा, ( प्रतिनिधी ) : – पाचोरा शहरातील जुन्या आठवडे बाजार परिसरात एका महिलेच्या अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. आयमरीमाय मंदिराजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी सुमारे ३.४५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आपल्या मुलीसह जुन्या आठवडे बाजार परिसरातील आयमरीमाय मंदिराजवळ होती. त्यावेळी तीन महिलांनी संगनमताने चोरी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यातील एका महिलेने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीच्या गळ्यातील सुमारे २.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तोडून घेतले. त्यानंतर संबंधित महिला आणि तिच्यासोबत असलेली मुलगी तेथून पळून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
चोरीस गेलेल्या सोन्याच्या मंगळसूत्राची किंमत अंदाजे ११ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत एका अल्पवयीन मुलीसह दोन अज्ञात महिलांचा उल्लेख आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नसून, त्यांचा शोध घेण्यासह पुढील तपास सुरू आहे.









