जळगाव (प्रतिनिधी) ;- शिवस्वराज्यदिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने उद्या रविवार दि.६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमितेचे पूजन आणि प्रा.डॉ.महेबूब सय्यद यांचे ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
६ जून हा शिवराज्याभिषेक दिन असून याच दिवशी रायगडावर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला होता. याच दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला. हा दिवस आता शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार आहे. राज्यातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये या वर्षापासून शिवस्वराज्यदिनानिमित्त कार्यक्रम घेतले जाणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने उद्या रविवारी दुपारी १ वाजता अहमदनगर येथील प्रा.महेबूब सय्यद यांचे ‘युगप्रवर्तक शिवाजी महाराज’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार असून प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार अध्यक्षस्थानी असतील. त्याआधी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे, अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ.शामकांत भादलीकर यांनी दिली.