जोशीमठ ;- उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा हिमस्खलन झाल्याने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत ३८४ जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. २३ एप्रिलला संध्याकाळच्या सुमारास चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेजवळ ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं.
यात सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शुक्रवारी चमोली जिल्ह्यातील जोशीमठ सेक्टरच्या सुमना क्षेत्रात जोरदार बर्फवृष्टी सुरु होती. यामुळे ही घटना घडली असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरवरून अलर्ट जारी केला होता. तसेच भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलं होतं. आज मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी घटनास्थळाचा हवाई दौरा केला. घटनास्थळाची पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी घटनेचा आढावा घेतला. त्यानंतर एनडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या. त्यानंतर बचावकार्याला अजून वेग आला. आज मी हवाई पाहणी केली आहे. बचावकार्य सुरु आहे. मात्र रस्ता अजूनही बंद आहे.असं मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी सांगितलं.