चाळीसगाव- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे असलेले मौजे संगमेश्वर येथील दोन हजार वर्षापूर्वीचे संगमेश्वर महादेव हे हेमाडपंथी शैलीच्या मंदिराचा लवकरच पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून कायापालट करण्यात येईल यासाठी तातडीने जिल्हाधिकारी यांच्या दालनात विभागाच्या अधिकार्यांची बैठक बोलावून नगरदेवळा येथील संगमेश्वर महादेव मंदिरासह मतदार संघातील पुरातत्व विभागाच्या अखत्यारीतील सर्वच मंदिरांच्या परिसर विकासाची योजना तयार केली जाईल. अशी ग्वाही खासदार उन्मेश पाटील यांनी दिली.

नगरदेवळा संगमेश्वर महादेव मंदिर परिसरातील किरण पाटील, अशोक पाटील, देवीदास पाटील, उत्तम पाटील यांच्यासह शिवभक्त कार्यकर्त्यांनी चाळीसगाव येथे खासदार उन्मेश पाटील यांची भेट घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करून परिसराचा विकास करावा.या आशयाचे निवेदन दिले. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी वरील प्रतिपादन केले. याप्रसंगी बाबा श्री महंत रवीदासजी महाराज वटेश्वर आश्रम वडगाव लांबे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार उन्मेश पाटील पुढे म्हणाले मतदार संघातील पुरातत्त्व विभागाच्या सर्व मंदिरांचे आजची परिस्थिती ,त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट, त्या मंदिर परिसरातील विकासासाठी असलेल्या नवीन योजना,करावयाचे उपाय योजना या संदर्भामध्ये आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक बोलावून या सर्व इतिहासकालीन हेमाडपंथी मंदिरांचा परिसर विकास करून भाविकांसाठी अधिक सेवासुविधा उपलब्ध केल्या जातील. यासाठी प्रयत्नशील असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी वटेश्वर आश्रम वडगाव लांबे येथील बाबा श्री महंत रवीदासजी महाराज तसेच कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.







