नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात आज काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, डाव्या पक्षांचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह पाच नेत्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.


राष्ट्रपतींना भेटल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधताना केंद्राचे कृषी कायदे रद्द करणे महत्वाचं असल्याची भूमिका राष्ट्र्पतींपुढे मांडल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाबाबत टिपणी करताना, ‘देशातील शेतकऱ्यांचा मोदी सरकारवरील विश्वास उडाला आहे. सरकारने शेतकरी माघार घेईल या भ्रमात राहू नये’ असा दावा केला.
कृषी कायदे हे देशातल्या शेतकऱ्यांचं हित साधणारेच आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं होतं. असं असेल तर मग आज शेतकरी रस्त्यावर का आहेत? आपल्या देशातला शेतकरी हा देशाच्या जडणघडणीतला एक जबाबदार घटक आहे. तो मागे हटणार नाही आणि घाबरणार नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
यावेळी कृषी कायद्यांवर योग्य मंथन झालं नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली. तर कृषी कायदे रद्द करा अशी मागणी आम्ही राष्ट्रपतींकडे केल्याचं सीताराम येचुरी यांनी सांगितलं आहे.







