विद्यापीठाने शिक्षणशास्त्र, एमसीएच्या परीक्षा ढकलल्या पुढे
जळगाव (प्रतिनिधी) – शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी २१ ते २३ ऑक्टोंबरच्या दरम्यान होणार आहेत. अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा देखील सुरु आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अंतिम वर्षाच्या विद्यापीठ परीक्षा पुढे ढकलाव्यात , अशी मागणी राष्ट्रवादीचे अँड.कुणाल पवार यांनी कुलगुरू पी पी.पाटील यांच्याकडे एका केली होती. ती मागणी विद्यापीठाने मान्य करून परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
अँड. कुणाल पवार यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात विनंती केली होती की, अंतिम वर्षाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे बरेच विद्यार्थी बी.एड,एम.एड अभ्यासक्रमाची सीईटी देतात. सदरची सीईटी २१ ते २३ ऑक्टोंबरच्या दरम्यान असल्यामुळे बरेच विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहतील. त्यामुळे वरील दिवशी असलेल्या विद्यापीठ परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात किंवा त्यांना परीक्षा देण्यासाठी पुढील मुदत मिळावी. म्हणजे संबधित विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही किंवा कोरोना महामारीमध्ये शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे म्हटले होते.
याविषयी विद्यापीठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर करण्यात आले आहे की, बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांमुळे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष, अंतिम सत्राच्या दि. २१, २२, २३ तसेच २८ आणि २९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून सुधारीत तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.
शासनाने बी.एड., एम.पी.एड. व एम.सी.ए. अभ्यासक्रमाच्या सी.ई.टी. परीक्षांचे तसेच त्यानंतर या अभ्यासक्रमांच्या फिल्ड टेस्टचे आयोजन जाहीर केले असल्यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (नियमित व बॅकलॉगसह) विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा विद्यार्थी हित लक्षात घेवून पुढे ढकलण्यात आल्या आहेत. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परीक्षा या आता १ नोव्हेंबर रोजी तर २२ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी, २३ ऑक्टोबरची परीक्षा १० नोव्हेंबर रोजी, २८ ऑक्टोबरची परीक्षा ११ नोव्हेंबर रोजी आणि २९ ऑक्टोबरची परीक्षा १२ नोव्हेंबर रोजी त्याच वेळेस ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने होणार आहेत. ऑफलाईन परीक्षा त्याच परीक्षा केंद्रावर होतील अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली आहे.