जळगाव (प्रतिनिधी) – येथील अनुराग स्टेट बँक कॉलनी येथील रहिवासी असलेले दशरथ महादू राठोड यांनी आजाराला कंटाळून नैराश्यातून छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे.
अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे दशरथ महादू राठोड वय 52 वर्षे हे त्यांच्या परिवारासह राहतात. मजुरी करून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपासून ते आजारी असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. आजारी असल्याने त्यातूनच त्यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घराच्या जवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये जाऊन छताला टांगून घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ राठोड यांना देवकर कॉलेजच्या आवारात असलेल्या सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. दुपारी एक वाजेच्या सुमारास दशरथ राठोड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आणण्यात आला होता. दशरथ राठोड यांच्या पश्चात पत्नी निर्मला तीन मुले सुनील, अनिल आणि योगेश असा परिवार आहे. पूर्ण परिवार मजुरी करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. या घटनेची रामानंद नगर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.