जळगाव (विशेष प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून सातत्याने शिक्षण क्षेत्रात नाविन्यता आणण्यासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमशील योजनांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच परंपरेने, विवेकानंद प्रतिष्ठान च्या वतीने शिक्षक दिनाच्या अनुषंगाने ‛राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका’ या विषयावरील वेबसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.


केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने वर्षभराच्या सकारात्मक व्यापक विचार मंथना नंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर केलेले आहे. या नवीन शैक्षणिक धोरणा विषयी सर्वच स्तरावर सदर धोरणांची उत्सुकता दिसून येत असून , या नवीन धोरणांची अंमलबजावणी सुद्धा खूपच महत्वपूर्ण असणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे, याच विषयावर आधारित वेब संवादाचे आयोजन करण्यात आले होते .
यात भोसला मिलिटरी स्कूलचे नाशिकचे कार्यकारी अध्यक्ष प्रकाश पाठक हे वेब संवादाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे हे वेब संवादाचे प्रमुख प्रवक्ते होते. ,त्याच प्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्राचे माजी उच्च तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे होते. त्याचबरोबर आय आय टी ,आय आय एम , एम डी सीप अकॅडमी चेन्नईचे दिनेश विक्टोर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिव राजेंद्र नन्नवरे यांनी केले तर माजी विद्यार्थी अमित सोळुंके यांच्यासह टेक्निकल टीमच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह करण्यात आला.
या वेब संवादात सुरुवातीला वेबसंवादाचे बीज भाषण डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. पुरातन कालापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरू-शिष्य परंपरेला महत्त्व आहे, त्यात गुरुची भूमिका ही अतिशय महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांचा महत्त्वाचा ‛रोल’असल्याचे डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी म्हटले आहे. लॉर्ड मैकालेच्या जोखडातून मुक्त करणारे हे दस्तऐवज असून गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे भारताच्या मातीचा सुगंध या शिक्षणाला यावा असा प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचे नियमित मूल्यांकन करून त्यांच्या प्रगतीचा उंचावणारा आलेख याबद्दल शिक्षकाला अभ्यास असणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे , औपचारिक भूमिकेच्या पलीकडे जाऊन शिक्षकांनी व्यापक विचार ठेवणे गरजेचे आहे, त्याचबरोबर, दिव्यांगांना समान वागणूक देणे ,नवीन तंत्रज्ञानाचा आणि कोरोनाच्या काळात डिस्टसिंगचा अवलंब करून वर्चुअल शिक्षण प्रभावी करण्याचे प्रयत्न कसे करता येतील याबद्दल या धोरणात विचार केला गेला आहे .त्याचबरोबर शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त कराव्या लागणाऱ्या कामांपासून मुक्त करून केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रीत करता यावं या संदर्भात उल्लेख या दस्तऐवजात केला असल्याचं त्यांनी या संवादात सांगितलं . शिक्षकांच्या हितासाठी , वारंवार शिक्षकांच्या होणाऱ्या बदल्यांंवर रोक लावत शिक्षक जेथे राहतो तेथेच नोकरी उपलब्ध करून देण्यासंदर्भात यात विचार केला गेला आहे .
खाजगी विद्यालयात देखील आता पात्र असलेले शिक्षक भरती केले जावे .त्याचबरोबर शिक्षक वर्गात कशा पद्धतीने शिकवतात,याचा फीडबॅक हा विद्यार्थ्यांकडून ही घेतला जावा,शैक्षणिक संस्थेत आवश्यकतेनुसार नियुक्ती केली जावी त्याच प्रमाणे शिक्षकाला कुठल्याही विशिष्ट शैलीमध्ये शिकवणे बांधिल न करता स्वायत्तता देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्या संदर्भात काय करता येईल? याचा देखील समावेश यात करण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे .शाळा हे कॉम्प्लेक्स पद्धतीने न राहता स्वतंत्र प्रगतीशील विद्यार्थ्यांची संस्था म्हणून विद्यालयाचा विचार व्हावा. बी एड साठी वेगळे कॉलेज असण्याची जरुरी नाही तर सामान्य युनिव्हर्सिटी सुद्धा हे कॉलेज चालवु शकणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .शिक्षकांमध्ये अध्यापनाची सक्ती नको तर शिक्षणाची आवड मनात असली पाहिजे तरच शिक्षण प्रभावी होऊ शकते आणि या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या शैक्षणिक धोरणांमध्ये असल्याचं डॉक्टर विनय सहस्रबुद्धे यांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर या ऑनलाईन चर्चा सत्रात विनोद तावडे यांनी विचार मांडले. शिक्षकांसह पालक आणि विद्यार्थी मग ते शालेय शिक्षण, हायर एज्युकेशन ,विदेशी शिक्षण या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा या धोरणात विचार केला गेला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ही सरकारचीच जबाबदारी असल्याचे सांगत ,जे विद्यार्थी विदेशात जाऊन 50 लाख रुपये शिक्षणासाठी खर्च करतात ते शिक्षण कमीत कमी खर्चात या देशात उपलब्ध करून देणे हे राज्यकर्त्यांचे काम असल्याचे त्याने म्हटले आहे आणि आपण हा प्रयत्न करत असताना हे शिक्षण खाजगीकरण होत असल्याची चर्चा चुकीच्या पद्धतीने पसरविण्यात आल्याची खंत त्यांनी यावेळीव्यक्त केली आहे. एकविसाव्या शतकात भारत हा महासत्ता देश म्हणून नावारूपास येत असताना शिक्षणाच्या ‛राईट स्पिरिट’विचारांनी एक वेगळा भारत निर्माण होऊ शकतो आणि त्यात विवेकानंद प्रतिष्ठानचे कार्य हे अतिशय समर्पक असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.
विनोद तावडे यांच्या नंतर दिनेश विक्टर यांनी आपले विचार मांडले. वर्गात शिक्षक-विद्यार्थ्यांचा रेशो हा एकास 50 होतांना दिसत आहे तर लाखो शिक्षकांची शिक्षण क्षेत्रात आवश्यकता असताना एवढी शिक्षक सरकारला घेणे शक्य नाही,तर शिक्षकांनाच मास्टर ट्रेनर बनवता येऊ शकते. तसेच नर्सरी ते हायर एज्युकेशन पर्यंत सर्व शिक्षकांची जबाबदारी महत्त्वाची असल्याने सर्व शिक्षकांना समान वेतन हा आराखडा बदलणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटलेे आहे पारंपारिक शिक्षण ,परीक्षा पद्धतीत बदल करून संकल्पना समजण्या वर दिला पाहिजे अशी भूमिका दिनेश विक्टर यांनी मांडली. वेब संवादाच्या शेवटी प्रकाश पाठक यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चरित्र निर्माणावर देखील भर दिला पाहिजे तसेच शिक्षकांनी उत्तमतेचा ध्यास घेतला पाहिजे. विज्ञानाला अध्यात्मिकता वाणिज्य आणि मानवता याची सांगड घालण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो असेही ते म्हणाले. शिक्षकी पेशा नाही तर एक व्रत असल्याचे त्यांनी म्हटले आहे आणि विद्यार्थी घडवतांना संपूर्ण राष्ट्राचे निर्माण शिक्षक करत असतात असेही गौरव उद्गार पाठक यांनी व्यक्त केले.
या वेब संवादासाठी विवेकानंद प्रतिष्ठान च्या अध्यक्ष शोभाताई पाटील यांच्यासह, जेठा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अनिल राव यांचे मार्गदर्शन लाभले. यावेब संवादात सहभागी झालेल्या काही शिक्षकांनी आपले प्रश्न मान्यवरांसमोर मांडलेत आणि समर्पक अशा उत्तराने या कार्यक्रमाचा समारोप झाला. हा कार्यक्रम फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब आणि झूम वर लाईव्ह दाखविण्यात आला.







