
हॉटेल एकांत गौरवसमोर चौघांकडून शिवीगाळ व मारहाण; फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
न्हावी, ता. यावल ( प्रतिनिधी ) :- यावल तालुक्यातील न्हावी येथे लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ४५ वर्षीय इसमावर धारदार चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. हॉटेल एकांत गौरवसमोर घडलेल्या या प्रकारात संबंधित इसमाला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच धारदार चाकूने पोटावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समशेर उर्फ संजय सरदार तडवी (वय ४५) यांच्यासोबत लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून इस्माईल तडवी, जुम्मा हैदर तडवी व त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन अनोळखी व्यक्तींनी संगनमताने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याचदरम्यान धारदार चाकूने संजय तडवी यांच्या पोटावर वार करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले.
या घटनेप्रकरणी समशेर उर्फ संजय सरदार तडवी यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून इस्माईल तडवी, जुम्मा हैदर तडवी व अन्य दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस हवालदार सुपडा पाटील करीत आहेत.







