मोहाडीच्या १९ शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ९५ हजार रुपयांचे धनादेश
जामनेर, ( प्रतिनिधी ) – जामनेरचे आमदार तथा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोहाडी येथील १९ शेतकऱ्यांनी मंगळवारी त्यांची भेट घेतली. शासनाकडून मिळालेली प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत या शेतकऱ्यांनी स्वेच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली. त्यांनी एकूण ९५ हजार रुपयांचे धनादेश महाजन यांच्याकडे सुपूर्द केले.
पहूर येथील शेतकरी तथा जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सोमवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश गिरीशभाऊ महाजन यांच्याकडे सुपूर्द केला होता. त्याच दिवशी देवपिंपरी, पळसखेडा, हिंगणा, हिवरखेडा, केकत निंभोरा आणि जामनेर येथील काही शेतकऱ्यांनीही महाजन यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी धनादेश दिले.
पहिल्याच टप्प्यात नेरी गटातील अनेक गावांचा सहभाग
या आवाहनाला पहिल्याच टप्प्यात नेरी गटातील अनेक गावांतील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, त्यांनी शासनाकडून मिळालेली मदत गरजू बांधवांच्या उपयोगी पडावी यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला स्वेच्छेने द्यावी, असे आवाहन महाजन यांनी केले होते. संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी गावागावांतून मदतीचा हात पुढे यावा, यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. मोहाडीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दिलेल्या योगदानामुळे या प्रयत्नाला आणखी बळ मिळाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळी परिस्थितीला समर्थपणे सामोरे जाईल, असा विश्वास यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रा. शरद पाटील, सरपंच दत्तात्रेय दिनकर पाटील, कडू पांडुरंग बागुल, आत्माराम बागुल, नंदू राजपूत, दिलीप पाटील, मोतीलाल बावस्कर, दिनकर पाटील, गोपाळ पाटील, भिवसन पाटील, छगन लोहार, गणेश तायडे, विश्वनाथ ठाकरे, ईश्वर वाघ, लालजी बागुल, नामदेव गुजर, किरण अहिर, सुधाकर बागुल, ईश्वर पाटील, सागर हिवाळे आणि रवींद्र भदाने हरी कोळी बापु तोताराम पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.










