जळगाव तालुक्यात शिरसोली शिवारात घडली घटना


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील नेव्हरे शिवारामध्ये ज्ञानेश्वर राजाराम ठाकूर हे शेती करतात.ते शेतात झोपडी करून राहतात. या शेतीची देखभाल व मशागत ज्ञानेश्वर ठाकूर हे करतात. दिवाळीनिमित्त कामासाठी अंतुर्ली येथील रहिवासी असलेले गोरख विठ्ठल ठाकूर (वय ४८) हे आपले चुलत भाऊ ज्ञानेश्वर ठाकूर यांच्याकडे शिरसोली येथे ३ दिवसांपासून आले होते. (केसीएन) गोरख ठाकूर व संशयित मुकुंदा पाटील हे दोघेही शेतात नियमित एकमेकांना भेटत असत. सोमवारी (ता. ९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास नेव्हरे शिवार येथील शेतामध्ये गोरख ठाकूर आणि मुकुंदा प्रल्हाद पाटील हे एकमेकांना भेटले. मिळालेल्या माहितीनुसार, तेथे दोघांमध्ये कुठल्यातरी कारणावरून वाद झाला.
किरकोळ वाद हेच या भांडणामागचे प्राथमिक कारण असल्याचे समजते. हा वाद विकोपास गेल्याने संतापलेल्या संशयित मुकुंदा पाटील (वय ५५) याने गोरख ठाकूर यांच्या डोक्यात पावड्याने जोरदार वार केला. डोक्यात वर्मी घाव बसल्यामुळे गोरख ठाकूर हे रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळून गंभीर जखमी झाले.(केसीएन) घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या गोरख ठाकूर यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. मयत गोरख ठाकूर यांची पत्नी व मुलगा सध्या पुण्यात राहत असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्येमुळे शिरसोलीसह पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून, घटनेनंतर संशयित आरोपी मुकुंदा पाटील हा फरार झाला आहे. पोलीस व ग्रामस्थ त्याचा कसून शोध घेत आहे.








