पाचोऱ्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली


भडगाव रोडवरील दत्त मंदिराजवळ भरदिवसा चोरी; ७५ हजारांचा ऐवज लंपास
पाचोरा, प्रतिनिधी : ड्युटीवरून घरी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना पाचोरा शहरातील भडगाव रोडवरील दत्त मंदिराजवळ ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३५ वाजेच्या सुमारास घडली. एक तोळा वजनाची सुमारे ७५ हजार रुपये किमतीची पोत चोरून नेल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, सीमा प्रवीण पाटील (वय ५०, रा. पुजारी नगर, भडगाव रोड, पाचोरा) या ड्युटीवरून घरी जात असताना लाल रंगाच्या क्रमांक नसलेल्या रॉयल एनफिल्ड हंटर दुचाकीवरून दोन जण त्यांच्या मागून आले. मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून घेतली आणि दोघेही पसार झाले.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दोघांचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक राहुल मार दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राहुल कोठारिया पुढील तपास करीत आहेत.









