जळगाव जिल्हा बँक निवडणूक: महायुतीची दमदार सुरवात; अर्ज माघारीच्या शेवटी शिवसेनेच्या दोन अन् भाजपची एक जागा बिनविरोध!

पारोळ्यात नलिनी पाटील, एरंडोलमध्ये मृणाल पाटील तर भुसावळमधून रजनीताई सावकारे संचालक
जळगाव (विशेष प्रतिनिधी): जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने अत्यंत दणदणीत सुरवात केली आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी दुपारी तीन वाजेची मुदत संपल्यानंतर महायुतीच्या पारोळा, एरंडोल आणि भुसावळ येथील तीनही जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये शिवसेनेच्या दोन आणि भाजपच्या एका जागेचा समावेश असून, या दिग्गजांच्या कुटुंबातील महिला सदस्यांच्या रूपाने जिल्हा बँकेत नवीन चेहऱ्यांची वर्णी लागली आहे.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. निर्धारित वेळेत अर्ज छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महायुतीच्या तीन महत्त्वाच्या सोसायटी मतदारसंघातून उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे समोर आले. यामध्ये पारोळा सोसायटी मतदारसंघातून नलिनी चिमणराव पाटील, तर एरंडोल सोसायटी मतदारसंघातून मृणाल अमोल पाटील यांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे, नलिनी पाटील या माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी आहेत, तर मृणाल पाटील या आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे या कुटुंबांमधील राजकीय वारसा आणि दबदबा आता जिल्हा बँकेच्या संचालक मंडळापर्यंत कायम राहिल्याचे दिसत आहे.
मंत्री संजय सावकारेंच्या पत्नीही बिनविरोध
याचप्रमाणे भुसावळ सोसायटी मतदारसंघातून राज्यमंत्री तथा भाजपचे नेते संजय सावकारे यांच्या सौभाग्यवती रजनीताई संजय सावकारे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. या विजयामुळे मंत्री संजय सावकारे यांच्या जागेवर आता त्यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या संचालिका म्हणून महत्त्वाची धुरा सांभाळणार आहेत.
या तिन्ही जागा बिनविरोध झाल्यामुळे महायुतीने जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपले खाते अत्यंत मजबूत रितीने उघडले आहे. या बिनविरोध विजयांमुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले असून, आता उर्वरित जागांसाठी कोणकोण मदानात राहतो आणि अंतिम लढत कशी रंगते, याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.









