अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी एक जण जेरबंद

गुन्ह्यात पोक्सोसह गंभीर कलमे वाढवली; पोलिसांच्या शोधपथकाची कारवाई
भुसावळ (विशेष प्रतिनिधी):
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी संबंधित गुन्ह्यात तपासादरम्यान लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) अत्यंत गंभीर कलमे वाढविण्यात आली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत शेख अशपाक शेख मुस्ताक (वय २८, रा. फकीरवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) या मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकं प्रकरण काय?
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता. परंतु, तपासाची व्याप्ती वाढल्यानंतर आणि पीडितेच्या जबाबातून समोर आलेल्या गंभीर बाबींनुसार या गुन्ह्यात बीएनएसचे कलम ६४(२)(एम) तसेच पोक्सो कायदा २०१२ मधील कडक कलमे (कलम ४, ५(एल) आणि ६) वाढविण्यात आली.
शोधपथकाची यशस्वी कारवाई
या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांनी या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे यांच्याकडे वर्ग केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष शोधपथकाने तातडीने सूत्रे हलवत आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी शेख अशपाक हा पोलिसांच्या हाती लागला आणि या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल तायडे आणि पोलीस अंमलदार जितेंद्र वितकर हे संयुक्तपणे करत आहेत.









