वीजगळतीवरून दोन अभियंत्यांचे निलंबन; २५० अभियंत्यांचे ठिय्या आंदोलन

SEA संघटना आक्रमक; निलंबन मागे घेण्याची मागणी
जळगाव, प्रतिनिधी : महावितरणमधील वीजगळतीचे प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरून दोन सहाय्यक अभियंत्यांवर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात अभियंता संघटना आक्रमक झाली आहे. सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA) च्या नेतृत्वाखाली सुमारे २५० अभियंत्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. निलंबित दोन्ही अभियंत्यांना पूर्ववत सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
बामणोद कक्षाचे सहाय्यक अभियंता संदीप पाटील आणि सावदा शहर कक्षाचे सहाय्यक अभियंता हेमंत चौधरी यांच्यावर वीजगळतीचे प्रमाण जास्त असल्याच्या कारणावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या निर्णयामुळे अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली असून, SEA संघटनेने या कारवाईला विरोध दर्शविला आहे.
वीजगळतीची जबाबदारी केवळ अभियंत्यांचीच का?
वीजगळती कमी करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधनसामग्री आणि वरिष्ठ कार्यालयाचे सहकार्य उपलब्ध असणे गरजेचे आहे. या बाबींचा विचार न करता वीजगळतीची संपूर्ण जबाबदारी केवळ कक्ष अभियंत्यांवर टाकणे कितपत योग्य आहे, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
निलंबन मागे घेण्याची मागणी
दोन्ही सहाय्यक अभियंत्यांचे निलंबन रद्द करून त्यांना पूर्ववत सेवेत रुजू करून घ्यावे, तसेच निलंबनाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या अभियंत्यांनी केली. या कारवाईविरोधात संघटनेने ठाम भूमिका घेतली असून, अभियंत्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.









