किनगाव दंगलीप्रकरणी सकल हिंदू समाज आक्रमक; विशेष पथकाद्वारे चौकशीची मागणी!

जळगाव प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथे २५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनादरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सकल हिंदू समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेची विशेष पथकाद्वारे सखोल चौकशी करून दंगल घडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.
पथसंचलनासाठी पोलिसांची परवानगी असतानाही त्यात अडथळा निर्माण करून तणावाची परिस्थिती निर्माण करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान झालेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी आणि संघाचे स्वयंसेवक जखमी झाल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
किनगावमधील तणावाला नेमके जबाबदार कोण, याचा शोध घेऊन घटनेमागील मुख्य सूत्रधारांवर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे. तसेच सोशल मीडियावर समाजात तेढ निर्माण करणारी आणि चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
किनगाव हे संवेदनशील गाव असल्याने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी. घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. आता या मागण्यांवर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.









