आयशरच्या धडकेत नवविवाहित तरुणाचा मृत्यू; तीन महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह
जळगाव (प्रतिनिधी) :– पाळधी-तरसोद बायपासवरील अपघातांची मालिका सुरूच असून, पाळधी रेल्वे पुलावर आयशर मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत योगेश गजमल राक्षे या तरुणाचा मृत्यू झाला. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या योगेश यांच्या मृत्यूमुळे राक्षे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

योगेश राक्षे हे आव्हाणे येथील खताच्या गोदामात मजुरीचे काम करत होते. दुचाकीवरून घरी जात असताना पाळधी रेल्वे पुलावर समोरून येणाऱ्या आयशर वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, ३० जुलै रोजी आसोदा पुलाचा भराव धसल्यानंतर बायपासवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे अवजड वाहतूक शहरातून वळवण्यात आली. या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गांवरील अपघातांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जुलैपासून आतापर्यंत या मार्गावरील अपघातांत २५ घटनांची नोंद झाली असून, त्यामध्ये १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या अपघातप्रकरणी पोलिसांनी आयशर वाहनचालक धर्मेंद्र प्रवीण सिंग गोयल याला ताब्यात घेतले आहे. या मार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.








