जळगाव (प्रतिनिधी) नशा करण्यासाठी पैसे द्या, अन्यथा परिणाम भोगा, अशा प्रकारच्या दहशतीचा प्रत्यय जळगाव शहरालगतच्या खेडी गावाजवळ घडलेल्या हल्ल्याच्या घटनेतून समोर आला आहे. पैशांची मागणी पूर्ण न केल्याच्या रागातून तीन ते चार जणांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत किशोर मधुकर बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किशोर बाविस्कर हे शिवनगर, खेडी येथे राहतात. भंगार विक्रीचा व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी आनंद पाटील, गौरव पाटील, सनी नावाचा तरुण आणि अन्य एका व्यक्तीने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. मात्र, बाविस्कर यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वाद निर्माण झाला. याच वादातून रात्री उशिरा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे.
मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी पुन्हा त्याच कारणावरून वाद पेटल्याचे सांगण्यात येते. संशयितांनी पुन्हा पैशांची मागणी केली; परंतु बाविस्कर यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात त्यांच्या कमरेला, पाठीवर आणि हातावर गंभीर दुखापत झाली.
हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी अवस्थेतील बाविस्कर यांना नातेवाईक आणि मित्रांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पैशांच्या मागणीवरून झालेला वाद थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयितांविरुद्ध पुढील कारवाई आणि घटनेमागील नेमके कारण पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.








