कपड्यांची ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी न करता बनावट लिंक पाठवून पैसे उकळले
जळगाव (प्रतिनिधी) :- कपड्यांची ऑनलाइन ऑर्डर दिल्यानंतर डिलिव्हरी न करता बनावट लिंक व क्यूआर कोड पाठवून एका महिलेची ८७ हजार २१९ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रीती मुकेश बांगड (वय ४१, जळगाव) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी २४ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन कपड्यांची ऑर्डर दिली होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरील एका अकाउंटवर संपर्क साधला. संबंधितांकडून कपड्यांची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी २४ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन कपड्यांची ऑर्डर दिली होती. यासाठी त्यांनी सोशल मीडियावरील एका अकाउंटवर संपर्क साधला. संबंधितांकडून कपड्यांची डिलिव्हरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मात्र, ऑर्डरची डिलिव्हरी न करता अज्ञात आरोपींनी फिर्यादींच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. त्यांना डिलिव्हरीसाठी तसेच पेमेंट करण्याच्या नावाखाली विविध क्यूआर कोड आणि लिंक पाठविण्यात आल्या. आरोपींनी सांगितलेल्या प्रक्रियेवर विश्वास ठेवून फिर्यादींनी ऑनलाइन पद्धतीने व्यवहार केला.
यानंतर त्यांच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून एकूण ८७ हजार २१९ रुपये परस्पर ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात आले. पैसे गेल्यानंतरही कपड्यांची डिलिव्हरी न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादींच्या लक्षात आले. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाणे गु.र.नं. २६७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क), ६६(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली विश्वास संपादन करून त्यांना व्हॉट्सॲपवर पेमेंट व डिलिव्हरीसाठी वेगवेगळे क्यूआर कोड पाठविले. तसेच बँक खात्याशी संबंधित लिंक पाठवून त्याद्वारे पैसे भरण्यास सांगितले. या प्रक्रियेतून आरोपींनी फिर्यादींच्या खात्यातून ८७,२१९ रुपये ऑनलाइन पद्धतीने स्वीकारून कपड्यांची ऑर्डर डिलिव्हर केली नाही, अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.










