९ लाख रुपयांचा निळ्या रंगाचा टाटा डंपर जप्त; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल तालुक्यातील रवंजे–दापोरी रस्त्यावरील टी-पॉईंटजवळ अवैधरित्या चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर एरंडोल पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे ९ लाख रुपये किमतीचा निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा डंपर (क्र.एमएच-१९-ईएक्स-१३२३) जप्त करण्यात आला असून, डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता रवंजे–दापोरी रस्त्यावरील टी-पॉईंट परिसरात डंपरमधून अवैधरित्या चोरीची वाळू वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. यावेळी डंपर चालक चंद्रकांत कोळी (वय ३५, रा. नेरी, ता. जामनेर, जि. जळगाव) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी मंडळ अधिकारी लक्ष्मण साळुंखे (वय ५७, रा. रिंगणगाव, जि. जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्र. १९९/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), तसेच गौण खनिजे विकास व विनियमन अधिनियम आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) व संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोहेकॉ/१७८६ दिनेश पाटील करीत आहेत.









