डॉ. वर्षा पाटील वुमेन्स व गोदावरी आयएमआरचा उपक्रम
जळगाव : डॉ. वर्षा पाटील वुमन्स व गोदावरी आयएमआर महाविद्यालय,जळगाव येथे “डिजिटल युगात स्पर्धा परीक्षेची तयारी” या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गोपाळ दर्जी यांनी मार्गदर्शन केले. स्वागत महाविद्यालयाच्या प्रिन्सिपल डॉ. नीलिमा वारके व गोदावरी आयएमआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले, मार्गदर्शन करताना प्रा. दर्जी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला दिला.

ते म्हणाले,पदवी घेत असतानाच मोठी स्वप्ने ठेवा आणि वेळेनुसार स्वतःला बदला, आयुष्य नक्कीच सुंदर होईल.”त्यांनी पुढे सांगितले की, स्वप्नांच्या वाटेत अडचणी खूप असतात, पण त्यासाठी तंत्रज्ञानाची जोड सोबत हवी.
इच्छाशक्ती असेल तर नक्कीच बदल होईल. स्वप्न पाहण्याची ताकद तुमच्यात निर्माण झाली की तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. विचार बदलले की तुमचे आयुष्य बदलेल. स्पर्धा परीक्षा: “लाथ मारेल तिथे पाणी काढेल याला स्पर्धा परीक्षा म्हणतात,” असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत.
शिस्त आणि बुद्धिमत्ता तुमच्याकडे पाहिजे, तसेच कामात सातत्य असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. उद्दिष्ट समोर ठेवून संयम ठेवा, निकाल नक्कीच मिळेल. या परिसंवादामुळे डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी योग्य दिशा आणि नवी प्रेरणा मिळाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवयानी महाजन यांनी केले.









