साई कृपा रेसिडेन्सीतील फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोकड चोरीला
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील साई कृपा रेसिडेन्सी परिसरात भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम व इमिटेशन ज्वेलरी असा एकूण २ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संपदा अजयगिरी गोस्वामी (वय ५४, व्यवसाय नोकरदार, रा. फ्लॅट क्रमांक ९, तिसरा मजला, साई कृपा रेसिडेन्सी, सेंट जोसेफ शाळेजवळ, सुयोग कॉलनी, जळगाव) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी संपदा गोस्वामी या ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास घराबाहेर गेल्या होत्या. याच दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातून सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच इमिटेशन ज्वेलरी असा मुद्देमाल चोरून नेला.
चोरीस गेलेल्या ऐवजामध्ये अंदाजे ८० हजार ५०० रुपये किमतीचा ३५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा चिंचपेटी हार, ४१ हजार ४०० रुपये किमतीचे १८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे कानातले, २५ हजार ३०० रुपये किमतीचे ११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ३६ हजार ८०० रुपये किमतीचे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व डायमंडचे मंगळसूत्र, २३ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, तसेच २३ हजार रुपये किमतीचे लहान सोन्याच्या बाळाच्या चार अंगठ्या व गणपतीचे पेंडंट यांचा समावेश आहे.
याशिवाय ८ हजार रुपये रोख रक्कम आणि इमिटेशन ज्वेलरी असा मुद्देमालही चोरीस गेला आहे. चोरी झालेल्या सर्व ऐवजाची एकूण किंमत सुमारे २ लाख ३८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२४, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३०५(अ), ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संजय तडवी, रामानंदनगर पोलीस ठाणे, जळगाव करीत आहेत. अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.









