गलवाडे रोडवरील घरफोडी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) — अमळनेर शहरातील ताराचंद नगर, टॉवर हाऊसजवळ गलवाडे रोड परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील ७३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शामकांत भास्कर पाटील (वय ५०, व्यवसाय नोकरी), रा. ताराचंद नगर, टॉवर हाऊसजवळ, गलवाडे रोड, अमळनेर यांच्या बंद घराला अज्ञात चोरट्याने लक्ष्य केले.
२० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ ते पहाटे ३.३० वाजेच्या दरम्यान चोरट्याने घराचे कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लाकडी व लोखंडी कपाटांची उचकापाचक करून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ८ हजार रुपये किमतीचे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, २० हजार रुपये किमतीचे ६ ग्रॅम वजनाचे कानातील झुमके, ३० हजार रुपये किमतीची १६ ग्रॅम वजनाची सोन्याची वज्र्याची अंगठी आणि १५ हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे कानातील वेल जोड यांचा समावेश आहे. अशा प्रकारे एकूण ७३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले आहेत.
घटनेनंतर फिर्यादीने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३), ३३१(४), ३०५(अ) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोहेकॉ/१९९८ मिलिंद सोनार, अमळनेर पोलीस ठाणे, करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.







