चौघांनविरुद्ध गुन्हा दाखल ; बनावट चेक देऊन पैसे उकळल्याचा आरोप
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील व्यापाऱ्याची मोठ्या रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या भाजीपापाल्याच्या व्यवसायात असताना लोकांकडून मोठी रक्कम घेऊन फसवणूक केली. तसेच घेतलेली रक्कम परत न करता फिर्यादीला त्रास दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्की ऊर्फ कवडामल प्रकाशलाल चावला (रा.भुसावळ) यांच्या तक्रारीवरून हंसराज प्रकाशलाल चावला (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ), बसंतकुमार गुरनोमल मधान (रा. चोपडा), वंदना ऊर्फ प्रिया मधान (रा. चोपडा) आणि आयशा तब्बसूम पीरजादे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, वरील तिघांनी संगनमत करून व्यवसायाच्या माध्यमातून लोकांकडून मोठी रक्कम स्वीकारली. त्यानंतर ती रक्कम परत न करता फिर्यादीची फसवणूक केली. एवढेच नव्हे तर बनावट व खोटे कागदपत्र तयार करून शिरपूर बँक तसेच एलआयसी कार्यालयातून पैसे काढून घेतल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. तसेच संबंधितांना खोटे चेक देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, चौथा आरोपी आयशा तब्बसुम पीरजादे (रा. चोपडा) हिने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे व चोपडा येथून पोलिसांच्या नावाने फिर्यादीच्या पत्नीला फोन करून सोन्याचे दागिने नातेवाईकांना देऊन टाकण्याची, अन्यथा जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या धमकीमुळे फिर्यादीची पत्नी घाबरून आजारी पडल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(३) आणि ३४०(२) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ४९१/२०२६ दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.









