सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र कार्यप्रदर्शन पुरस्कार – २०२५
जळगाव ( प्रतिनिधी ) – सातपुडा विकास मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र, पालला वर्ष २०२५ साठी ‘Best KVK Performance Award – 2025’ (सर्वोत्कृष्ट कृषी विज्ञान केंद्र कार्यप्रदर्शन पुरस्कार – २०२५) प्राप्त झाला आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद–कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (ICAR-ATARI), पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र, गुजरात व गोवा राज्यांतील कृषी विज्ञान केंद्रांची क्षेत्रीय कार्यशाळा दि. २९ सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ICAR-ATARI, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती.


या क्षेत्रीय कार्यशाळेत कृषी विज्ञान केंद्र, पालच्या वर्ष २०२५ मधील कार्याचे सादरीकरण डॉ. महेश वि. महाजन, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र, पाल यांनी केले. केंद्रामार्फत राबविण्यात आलेल्या विविध शेतकरी-केंद्रित उपक्रमांची, कृषी तंत्रज्ञान प्रसाराची तसेच शेतकऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी प्रभावी सादरीकरणाद्वारे मांडली.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र, पालच्या वर्ष २०२५ च्या वार्षिक अहवालाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या वार्षिक अहवालामध्ये शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, ऑन फार्म टेस्टिंग, कृषी तंत्रज्ञान प्रसार, पीक संरक्षण, केळी उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती, पशुसंवर्धन, महिला व ग्रामीण युवकांसाठी राबविण्यात आलेले उपक्रम तसेच विविध विस्तारविषयक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे.
कृषी विज्ञान केंद्र, पालमार्फत निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान, केळी महोत्सव, केळी शाळा, कृषी पर्यटन, नैसर्गिक शेती, जैविक निविष्ठा निर्मिती व वापर, मशरूम उत्पादन, पशुसंवर्धन, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान प्रसार या उपक्रमांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पादनक्षमता व उत्पन्नवाढीसाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
या प्रसंगी डॉ. इंद्रमणी, कुलगुरू, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी; डॉ. शरद गडाख, कुलगुरू, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला; डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी; डॉ. पी. दास, माजी संचालक, कृषी विस्तार शिक्षण, ICAR, नवी दिल्ली; डॉ. के. डी. कोकाटे, माजी संचालक, कृषी विस्तार शिक्षण, ICAR, नवी दिल्ली; डॉ. एम. एम. अधिकारी, माजी कुलगुरू, कृषी विद्यापीठ, मोहनपूर; डॉ. एस. के. रॉय, संचालक, ICAR-ATARI, पुणे; डॉ. शाकीर अली, प्रधान वैज्ञानिक, ICAR-ATARI, पुणे तसेच विविध कृषी विद्यापीठांचे संचालक, कृषी विस्तार शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख शास्त्रज्ञ व प्रमुख उपस्थित होते.
यावेळी डॉ. जी. के. ससाणे, संचालक, कृषी विस्तार शिक्षण, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी; डॉ. राकेश अहिरे, संचालक, कृषी विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी; डॉ. तोरणे, संचालक, कृषी विद्यापीठ, दापोली; डॉ. चिंचपूरे, अकोला; डॉ. एन. बी. जाधव, संचालक, कृषी विस्तार शिक्षण, जुनागढ कृषी विद्यापीठ; डॉ. शर्मा, नवसारी कृषी विद्यापीठ; डॉ. पटेल, आनंद कृषी विद्यापीठ तसेच डॉ. जडेजा, दंतेवाडा कृषी विद्यापीठ यांचीही उपस्थिती होती.
कृषी विज्ञान केंद्र, पालला प्राप्त झालेला ‘Best KVK Performance Award – 2025’ हा केंद्राच्या संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि शेतकरी-केंद्रित कार्याची पावती आहे. केंद्राच्या विविध उपक्रमांमुळे कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार, शेतकरी प्रशिक्षण, तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिकाधारित हस्तांतरण आणि स्थानिक पातळीवर कृषी क्षेत्रातील नवोपक्रमांना चालना मिळत आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सातपुडा विकास मंडळाचे मा. आ. श्री. शिरीषदादा चौधरी, मा. श्री. अशोक झांबरे (अध्यक्ष) आणि मा. श्री. अजित पाटील (सचिव) यांनी कृषी विज्ञान केंद्र, पालच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या पुरस्कारामुळे कृषी विज्ञान केंद्र, पालच्या शेतकरी-केंद्रित कार्याला अधिक बळ मिळाले असून, भविष्यातही आधुनिक, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्राच्या शास्त्रज्ञांकडून अधिक जोमाने कार्य करण्यात येणार आहे.









