जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजारावर महापालिका प्रशासनाकडून आज बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी महापालिका प्रशासनाकडून पथक नियुक्त करण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्तही मागविण्यात आला आहे.


अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजाराची जागा जळगाव महापालिकेने ९९ वर्षांच्या भाडेकराराने काही व्यावसायिकांना वापरासाठी दिली होती. मात्र, सदर भाडेकरार सन २०१८ मध्ये संपुष्टात आला. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या कार्यकाळात सदर जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्यासंदर्भात महासभेत ठराव करण्यात आला होता.
महासभेच्या ठरावानंतर संबंधित व्यावसायिकांना जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसांवर महापालिका प्रशासनाकडून सुनावणीदेखील घेण्यात आली. मात्र, त्यानंतरही संबंधित व्यावसायिकांनी जागा खाली केली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पुन्हा संबंधितांना जागा रिकामी करण्याचे आवाहन केले.तरीदेखील व्यावसायिकांकडून जागा खाली करण्यात आली नसल्याने महापालिका प्रशासनाने आता अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्या आदेशानुसार उपायुक्त पंकज गोसावी यांनी कारवाईसाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.
त्यानुसार आज, बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता अजिंठा चौफुलीजवळील भंगार बाजारावर कारवाई करण्यात येणार आहे. संभाव्य विरोध अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याची माहिती आहे.








