


पिंपरूड शिवारातील शेतकऱ्याला चोरट्यांचा फटका; फवारणी पंप, मोटार पंप आणि कॉपर वायरवर डल्ला
फैजपूर ( प्रतिनिधी ) – यावल तालुक्यातील पिंपरूड शिवारात अज्ञात चोरट्यांनी शेतातील शेती उपयोगी साहित्यावर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत सुमारे ७४ हजार २०० रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची नोंद फैजपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांत दाखल नोंदीनुसार, पिंपरूड शिवारातील गट क्रमांक १८९ मधील शेतातून फवारणी पंप, मोटार पंप, कॉपर वायर व इतर साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
याप्रकरणी नितीन भोजराज राणे (वय ५६, रा. भारंबेवाडा, फैजपूर, ता. यावल) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतातील साहित्य चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.









